मराठी ब्लॉग का?

 अजून एक मराठी ब्लॉग? पोस्ट क्र. ००१ 

ज्योतिष हा माझा अतिशय आवडीचा विषय आहे. मी अभ्यासही करतो, पत्रिका अभ्यासतो, त्यावर लेखन मनन चिंतन, सोशल मीडियावर पोस्ट टाकणं हे सगळं चालू असतं. 

वैदिक ज्योतिषाची व्याप्ती इतकी आहे की नुसतं मराठीमध्ये त्यावर सगळी पुस्तके वाचायला मिळावीत हे असं फार कमी आहे व. दा. भटांची आणि काही ठराविक लेखकांची पुस्तके सोडली तर मराठी मधलं ज्योतिष वाङ्गमय हे तसं अजून तितके समृद्ध नाही. आता हिंदीमध्ये आणि इंग्लिश मध्ये खूप लिखाण वैदिक ज्योतिषावर झालेले आहे बी व्ही रमण यांच्यासारखे दक्षिणात्य ज्योतिषकार यांनी आपलं संपूर्ण लेखन इंग्लिश मध्ये केलेलं आहे.


हे सगळं विविध भाषेतील लिखाण तसेच जुने संस्कृत संदर्भ ग्रंथ आणि त्यांची हिंदी भाषांतरे वाचल्यावर एक गोष्ट लक्षात आली की ज्योतिष हा विषय खूप गंभीर सुरामध्ये लिहिलेला आहे. तसे पाहता ज्योतिष ही हलक्यात घ्यायची गोष्ट नाहीच परंतु लिखाण सुद्धा धीर गंभीर असलं पाहिजे असं कुठे आहे? गंभीर विषय सुद्धा हलक्या आणि सोप्या भाषेमध्ये समजावता येऊ शकतो. सोप्या भाषेत विचारही करता येतो. जड जड विद्वत्ताप्रचूर शब्दांनी ज्योतिषीय ग्रंथांच्या भाषेला एक प्रकारची सूज आलेली आहे त्यामुळे वाचणारेही एखादे कडू औषध पिल्यासारखे ज्योतिषीय ग्रंथ साहित्य वाचतात, आणि खाण तशी माती या न्यायाने स्वतः लिखाण करताना सुद्धा दुर्बोध आणि गंभीर भाषेत लिहितात.


याउलट वैदिक ज्योतिष शास्त्रावरतीच काही नवीन परदेशी अभ्यासकांचे लेख ब्लॉग वाचले त्यांची लिहिण्याची भाषा जीवनाशी इतकी समरस असते इतकी सोपी असते की काय लिहिलं आहे ते वाचणाऱ्याला पटकन कळतं. नक्षत्र ज्योतिष सारख्या क्लिष्ट विषयांनाही हसत खेळत हात घातलेले काही बाहेरील ज्योतिष अभ्यासकांचे लेख वाचले आणि नुसते वाचले नाही तर वाचता वाचता त्यामध्ये अशी गोष्ट जाणवली की ते लेखक स्वतः खेळकर आहेत आणि विषयाची पूर्ण मस्ती अंगात भिनवून लेख लिहितात.

 

हा त्यांचा मी उदो उदो करतोय असं नाही, पण एक लेखनाची पद्धत लक्षात आली आहे, तो विषय, तशा प्रकारची सहज विषयाची हाताळणी आपल्या भाषेमध्ये का नाहीये असं जेव्हा मला वाटलं त्यावेळी हे माझं स्वतःचं मांडलेलं अतिशय प्रामाणिक मत आहे. त्यांच्या लिखाणाचे काही काही उतारे मी वेळोवेळी संदर्भसाठी देईनच. हे माझं लिखाण त्यांची उसनवारी किंवा कॉपी आहे असं नाही तर त्यांच्या लेखांची बैठक लक्षात घेता आपल्या भाषेमध्ये त्या प्रकारे चिंतन करता येतं का हे पाहण्याचा हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. 


एक सोपे उदाहरण सांगतो म्हणजे मी काय म्हणतो आहे ते तुमच्या लक्षात येईल. एक लेख मी वाचला होता अश्विनी नक्षत्र बद्दलचा. तर अश्विनी नक्षत्रामध्ये जन्मलेल्या सेलिब्रिटींची- अर्थात हे सर्व पाश्चात्य सेलिब्रेटी होय, तर त्यांची तुलना एका लेखांमध्ये केलेली होती. अश्विनी नक्षत्रांच्या गुणधर्माला धरून त्यांच्या सवयी, त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटना, त्या सेलिब्रिटींच्या आयुष्यातला समान धागा, काही त्यांचे समान गुण जे अश्विनी नक्षत्रामुळे त्यांच्यामध्ये आहेत, शिवाय, अश्विनी नक्षत्रातल्या चरणांचा आणि त्या चरण स्वामींचा त्यांच्या जीवनावरती प्रभाव कसा पडला हा लेख अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेमध्ये लिहिलेला होता. तो लेख जो कोणी वाचेल त्यांना अश्विनी नक्षत्रांच्या गुणधर्मासाठी वेगळं वाचन करावंच लागणार नाही या उलट आपल्याकडचे लेख म्हणजे- नक्षत्र कसं आहे? नक्षत्रांची देवता कोणती आहे? श्लोक काय आहेत? त्यानंतर उपाय काय आहेत? नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्ती कसा वागतो? त्याने कोणते व्यवसाय करावेत? त्रास असल्यावर काय दाने करावीत?.... हे म्हणजे तुम्हाला पाठच करावे लागेल अशा प्रकारे लिहिलेलं असतं.


माझा लिखाणाचा उद्देश हा आपल्या ज्योतिष साहित्य परंपरेमधील गुणदोष दाखवणं नाही तर आपल्या कडे आधीच्या मोठ्या लोकांनी जे ज्ञानाचे पर्वत उभे केले आहेत त्यांनाच फक्त साध्या आणि हलक्या भाषेमध्ये सामान्य मराठी माणसापर्यंत पोहोचवणे हा आहे.

Comments